इतिहास व पार्श्वभूमी

कर्मवीरांच्या कार्याला प्रथम विरोध करणारे व नंतर त्यांच्या जादूमय व्यक्तिमत्वाने भारावलेले कै. कृष्णाजी शंकर दीक्षित या कॉलेज ला पहिले प्राचार्य लाभले. त्यांनी विनावेतन सहा वर्षे काम केले तसेच सरकारी लट्ठ पगाराची चालून आलेल्या नोकरीला लाथ मारून संस्थेची आजन्म सेवा करणारे कै. शंकरराव बळवंतराव सुखटणकर हे दुसरे प्राचार्य लाभले. नंतर श्रीपाल शिवराय चौगुले, कै. नानासाहेब रा. माने, कै. अब्दुलगनी दादामियाँ आतार, कै. गोविंदभाई दामोदरदास गुजर, श्री. बी. बी. खोत, कै. एम. एस. निकम, कै. बी. एम. ठोके, श्री. के. ए. गायकवाड, कै. आर. ही. वनारसे, श्री. बी. टी. गुंजाटे, कै. डी. पी. गरगटे, श्री. पी. एस. पाटील, श्री. एस. टी. लवळे, श्री. व्ही. के. गोरे, श्री. एस. आर. डोंगरे, श्री. डी. व्ही. धनावडे इत्यादी नामवंत प्राचार्य या विद्यालयास लाभले. कै. सुखटणकर व कै. ए. डी. आतार यांना कर्मवीरांनी पुढील शिक्षणासाठी इंग्लंड ला पाठविले होते. कै. एस. बी. सुखटणकर, व कै. बी. एम. ठोके यांना राज्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. तसेच मा. श्री. के. ए. गायकवाड यांचा राष्ट्रीय पुरस्कार देऊन शासनाने गौरव केला आहे.

कर्मवीरांच्या व्यक्तिमत्वाचा व कार्याचा सर्वांवर उत्तम प्रभाव पडलेला असल्यामुळे कॉलेजची उत्तरोत्तर प्रगती होत गेली. नामवंत प्राचार्यांच्या प्रमाणेच या विद्यालयास वेळोवेळी आदर्श प्राध्यापक, सेवक, व विद्यार्थी लाभले आहेत. कै. सुखटणकर यांनी मानसशास्त्र व गणिताच्या पुस्तकाचे लेखन केले आहे. श्री. बी. एम. ठोके यांनी कर्मवीरांचा चरित्र ग्रंथ लिहला आहे. अनेक माजी विद्यार्थी शिक्षकांमधून काही शिक्षणाधिकारी, काही डेप्युटी कलेक्टर, काही गट शिक्षणाधिकारी तर काही राजकारण व समाजकारणामध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवीत आहेत. कर्मवीर समाधी परिसरात अध्यापक विद्यालयाची प्रशस्त इमारत, भव्य सभागृह, प्रयोगशाळा, समृद्ध ग्रंथालय, भरपूर क्रीडा साहित्य पुरेशा वर्ग खोल्या इ. भौतिक सुविधा उपलब्ध आहेत. २१ व्या शतकाला सामोरे जाण्यासाठी दूरदर्शन संच, रेडिओ, टेपरेकॉर्डर, ओव्हरहेड प्रोजेक्टर, १६ एम. एम. प्रोजेक्टर, रेकॉर्डप्लेअर, एल. सी. डी. प्रोजेक्टर, संगणक कक्ष वेबसाईट, वेब कॅमेरा, इंटरनेट या सुविधा व वसतीगृहाची सुविधा आहे. कार्यानुभवासाठी धनिणीच्या बागेत साडेनऊ एकर शेती व काकडे बागेत अडीच एकर शेती आहे. अध्यापक विद्यालयाची कै. रा. ब. काळे जीवन शिक्षण मंदिर सराव पाठशाळा, या अध्यापक विद्यालयास १७ जुलै २०१० रोजी ७५ वर्षे पूर्ण झाली त्या निमित्त १७ जुलै २००९ ते १७ जुलै २०१० अमृत महोत्सवी वर्ष विविध उपक्रमांनी साजरे केले.